सैन्याच्या शौर्याला सलाम!

पाकिस्तानचे जगाच्या नकाशावरील अस्तित्व नष्ट झाल्याशिवाय विश्वशांती लाभणार नाही. पाकिस्तानसारखी राष्ट्रे ही फक्त हिंदुस्थानलाच नाही तर जगाला धोकादायक ठरली आहेत.  हिंदुस्थानी वायुसेनेच्या लढवय्यांनी कमाल केली आहे. त्यांच्या या शौर्यामळे देशभरातच देशभक्तीचा एक माहोल निर्माण होणे, त्याचा जल्लोष केला जाणे या गोष्टी अनपेक्षित नाहीत. तसा तो देशभरात केलाही जात आहे. फक्त या कारवाईचे आणि पुलवामातील बलिदानाचे राजकारण होऊ नये. कारण कारवाई सैनिकांची आहे. हे यश पूर्णपणे बहादूर सैनिकांचे आहे. सैन्याच्या शौर्याला सलाम!  

हिंदुस्थानने हल्ला केला तर पाकिस्तान जशास तसे उत्तर देईल  अशी धमकी त्या देशाने दिली होती. मात्र आता हिंदुस्थानी सैन्याने पाकव्याप्त कश्मीरात घुसून हल्ला केला आहे. मंगळवारी भल्यापहाटे साडेतीनच्या सुमारास आपल्या वायुसेनेची फायटर विमाने पाकच्या हद्दीत घुसली व त्यांनी दहशतवादी छावण्यांवर बॉम्बहल्ले केले. जैश-ए-मोहम्मदवर झालेली ही कारवाई असून एक हजार किलो वजनाचे बॉम्ब 12 मिराज विमानांतून फेकण्यात आले. कश्मीरमधील पुलवामात बारा दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्यात आपल्या 40 जवानांची हत्या ज्या निर्घृण पद्धतीने करण्यात आली त्यामुळे देशात संताप होता. 40 जवानांच्या बलिदानाचा बदला कधी घेणार? असा प्रश्न लोकांच्या मनात होता. मंगळवारी पहाटे पाकव्याप्त बालाकोटवर बॉम्बहल्ले करून वायुसेनेने पाकिस्तानातील दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त केल्या आहेत. उरी हल्ल्यानंतर असाच एक सर्जिकल स्ट्राइक सैन्याने केला होता, पण पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहिले आणि त्यांनी परत ‘पुलवामा’ घडवले. पाकव्याप्त कश्मीरात दहशतवाद घडवण्याच्या फॅक्टऱ्या आहेत व जैश-ए-मोहम्मदसारख्या सैतानी संघटना तेथून हिंदुस्थान अस्थिर व अशांत करण्याचे कारस्थान करीत असतात. वास्तविक पाकव्याप्त कश्मीरवर आजही हिंदुस्थानचाच दावा आहे. पाकिस्तानच्या कब्जातील या भागावर पाक सैन्याचे नियंत्रण आहे. मात्र हा भाग आपला आहे व आपल्याच भूमीवर आमच्या वायुसेनेने बॉम्बहल्ले केले. त्या ठिकाणच्या दहशतवादी छावण्यांतील सुमारे 300 अतिरेकी मारले गेले असावेत असा दावा करण्यात आला आहे. त्याशिवाय

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या

मसूद अजहरचा भाऊ इब्राहिम आणि मेहुणा मौलाना युसूफ अजहर याच्यासह इतर 25 ‘ट्रेनर्स’ या हल्ल्यात ठार झाले असेदेखील सांगण्यात येत आहे. हा ‘जैश-ए-मोहम्मद’च नव्हे तर सर्वच पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनांसाठी मोठाच दणका आहे. मात्र एवढ्यावरच थांबता येणार नाही. हे हल्ले सुरूच ठेवले पाहिजेत. कारण त्याशिवाय पाकड्या दहशतवाद्यांचा कायमचा नायनाट होणार नाही. सभ्य, संयमी भाषेत सांगायचे तर आपण आता पाकव्याप्त कश्मीरात बालाकोटवर हल्ला केला आहे, मात्र त्यामुळे पुलवामाचा बदला पूर्ण झाला काय, हा प्रश्न आहेच. तूर्त तरी त्याचे उत्तर अधांतरी आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले होते की, ‘‘आग माझ्याही मनात पेटली आहे. पाकिस्तानवरील कारवाईचे संपूर्ण अधिकार सैन्याला दिले आहेत!’’ पंतप्रधानांनी सांगितल्यानुसार सैन्याने पहिली कारवाई केली. ही कारवाई आता सुरूच राहिली पाहिजे. हिंदुस्थानी सैनिकांचे रक्त स्वस्त नाही व त्यांनी सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत पाकड्या अतिरेक्यांना चुकवावी लागेल. पाकव्याप्त कश्मीरात मोठ्या संख्येने दहशतवादी छावण्या आहेत. पाक सरकार व आयएसआयच्या पाठबळाशिवाय या छावण्या चालूच शकत नाहीत. पाकचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात, पुलवामा हल्ल्याशी त्यांचा संबंध नाही, पण मग बालाकोटातील एवढ्या मोठ्या दहशतवादी छावण्या म्हणजे सरकारी अनुदानाने सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यशाळा होत्या काय? दाऊद, मसूद अजहरसारखे लोक पाकिस्तानच्या भूमीवर आहेत. लादेनसुद्धा होताच. त्या लादेनला अमेरिकेने

पाकिस्तानात घुसून

मारले तसे मसूद अजहरसारख्या सैतानांना खतम केले पाहिजे. तरच बदला पूर्ण होईल. पाकिस्तानचे जगाच्या नकाशावरील अस्तित्व नष्ट झाल्याशिवाय विश्वशांती लाभणार नाही. पाकिस्तानसारखी राष्ट्रे ही फक्त हिंदुस्थानलाच नाही तर जगाला धोकादायक ठरली आहेत. पाकिस्तानात लोकशाही नाही. त्यामुळे नागरी सरकारे व पंतप्रधानांच्या आडून एक प्रकारे लष्करशहाच सत्ता उपभोगत असतात. पुन्हा हिंदुस्थानशी भांडण संपले तर पाकचे सैन्य बेकार होईल. त्यामुळे पोटापाण्याचे उद्योग म्हणून हिंदुस्थानशी सततचे युद्ध सुरू ठेवले जाते. अशा सैतानी डोक्याचे लोक एखादा देश चालवीत असतील तर त्यांच्याशी शांतीवार्ता होणे अवघड ठरते. सत्तर वर्षे या चर्चा व शांतीवार्ता सुरू आहेत. इंदिरा गांधी यांनी 1971 साली सगळ्यात मोठी सैन्य कारवाई करून पाकिस्तानचे दोन तुकडेच केले. ‘लातों के भूत बातों से नही मानते’ हीच इंदिरा गांधींची धारणा होती व इंदिरा गांधींनी पाकिस्तानात फौजा घुसवून त्यांना गुडघे टेकायला लावले. हिंदुस्थानी सैन्याचा हा शौर्य इतिहास आहे व तो इंदिरा गांधी यांच्या काळात घडला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली असाच शौर्य इतिहास नव्याने घडेल व त्याची सुरुवात झाली आहे. हिंदुस्थानी वायुसेनेच्या लढवय्यांनी कमाल केली आहे. त्यांच्या या शौर्यामळे देशभरातच देशभक्तीचा एक माहोल निर्माण होणे, त्याचा जल्लोष केला जाणे या गोष्टी अनपेक्षित नाहीत. तसा तो देशभरात केलाही जात आहे. फक्त अपेक्षा इतकीच या कारवाईचे आणि पुलवामातील बलिदानाचे राजकारण होऊ नये. कारण कारवाई सैनिकांची आहे. हे यश पूर्णपणे बहादूर सैनिकांचे आहे. सैन्याच्या शौर्याला सलाम!


प्रतिक्रिया व्यक्त करा

मराठी